
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी मिळाली की प्रतिभेचा जल्लोष होतो- कृष्णकुमार गोयल
‘जल्लोष २०२६’मध्ये पिंपरी-चिंचवड विभागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्स्फूर्त आविष्कार; १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग
खडकी वार्ताहर,:
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळाले, तर त्यांच्या प्रतिभेला नवी दिशा मिळते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी मिळाली की, प्रतिभेचा खऱ्या अर्थाने जल्लोष होतो, असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित ‘जल्लोष २०२६’ पिंपरी-चिंचवड विभागीय स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), खडकी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या स्पर्धांमध्ये विविध महाविद्यालयांतील सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. संगीता जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गणेश भामे, विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालिका डॉ. सविता कुलकर्णी, खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड, सदस्य ॲड. अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थी, सीईओ उत्तमकुमार इंदोरे विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, स्पर्धक विद्यार्थी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रास्ताविकात म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील सर्जनशीलतेला चालना देणे आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देणे हा ‘जल्लोष’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.” शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, साहित्य, संगीत, नृत्य आणि अभिनय या क्षेत्रांत विद्यार्थ्यांना संधी मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘जल्लोष २०२६’च्या पिंपरी-चिंचवड विभागीय स्पर्धांतील विजेते व उपविजेते महाविद्यालयांची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ललितकला विभाग विजेते – एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी, उपविजेता-डॉ. डी. वाय. पाटील एसीएस कॉलेज, पिंपरी.
नृत्य विजेता-डॉ. डी. वाय. पाटील एसीएस कॉलेज, पिंपरी, उपविजेता – प्रतिभा कॉलेज, चिंचवड, संगीत विजेता -डॉ. डी. वाय. पाटील एसीएस कॉलेज, पिंपरी, उपविजेता – एमआयटी एसीएस, आळंदी.
साहित्य विजेता -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, उपविजेता – प्रतिभा कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज, चिंचवड. तसेच प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी आणि एमआयटी एसीएस, आळंदी यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
अभिनय :विजेता टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी, उपविजेता -एमआयटी एसीएस, आळंदी.
डॉ. डी. वाय. पाटील एसीएस कॉलेज
सर्वसाधारण विजेते-विविध कला प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करत डॉ. डी. वाय. पाटील एसीएस कॉलेज, पिंपरी यांनी ‘जल्लोष २०२६’च्या पिंपरी-चिंचवड विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर एमआयटी एसीएस, आळंदी यांनी सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले.
विजेत्या व उपविजेत्या महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली.‘जल्लोष २०२६’ स्पर्धेच्या च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना, आत्मविश्वासाला बळ आणि व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा मिळते, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्रा. स्वामीराज भिसे यांनी केले.यावेळी हा विद्यार्थी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापककेतर कर्मचारी उपस्थित होते.


