दि 16/09/2023 रोजी TJ ट्रेकिंग क्लब चा मळवली स्थित किल्ले विसापूर ट्रेक झाला मी प्रा.ज्योती वाघमारे , प्रा. घुले सर, व 56 विद्यार्थी सहभागी झालो. सर्वांनी खडकी रेल्वे स्टेशन ला सकाळी 6.30 पोहचायचे होते. साधारण 36 मुले वेळेत उपस्थिती होती, हळूहळू 56 झाली. काही विद्यार्थ्यांचे पालक मुलांना सोडवायला आले होते. पालकांची काळजी कळत होती त्यांच्याशी बोलून झाल्यावर ते निश्चिन्त झाले. काही विद्यार्थी पहिल्यांदा च ट्रेक साठी आली होती. सर्व विद्यार्थ्यांची हजेरी नोंद केल्या नंतर मुलांचे 5 व मुलींचे 3 गट केले, ट्रेकिंगचा अनुभव असलेल्या 8 विद्यार्थ्यांना या गटाचे गटनायक म्हणून जबाबदारी दिली. जसे कि गटनायकाने गटातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी, गटातील विदयार्थी ट्रेन मध्ये व्यवस्थित चढेल, उतरेल ट्रेक दरम्यान गटातील सहभागी चुकणार नाहीत याची काळजी घेणे. गट केल्यामुळे खूप फायदा झाला.साधारण 7.30 च्या लोकलट्रेन मध्ये आम्ही सर्व ट्रेकर्स चढलो. ट्रेन मध्ये थोडी गर्दी होती. लोकलचा प्रवास छान झाला, काहींनी गाण्याच्या भेंडया सुरु केल्या काही मुले selfie काढत होते. एक तासाचा प्रवास सुखरूप झाला सर्वजण व्यवस्थित उतरले. स्टेशन च्या बाहेर असलेल्या असलेल्या छोटया हॉटेल मध्ये सर्व ट्रेकर्स नी नाश्ता केला, काहींनी वडापाव, तर काहींनी पोहे फस्त केले. नाश्ता झाल्यानंतर मुलांना काही सूचना दिल्या. मळवलीतील काही स्थानिक लोकांशी माहिती मिळवली किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत एक पाटण गावातून, एक भाजे लेणीतून आणि गायमुख खिंडमधून, त्यानुसार पाटण गावातून किल्याच्या ट्रेक ला सुरवात केली. तसा किल्ले विसापूर चा ट्रेक मध्यम प्रकारचा आहे, प्रामुख्याने ट्रेकर्स पावसाळ्यात हा ट्रेक करतात. आम्ही चढाईला सुरवात केली कुठे घसरनीची पायवाट तर कुठे खूप अरुंद पायवाट, कुठे गर्द झाडीतून रस्ता तर कुठे काटेरी झाडांतून वाट. चढताना पुंन्हा तीन गट झाले ज्यांनी अगोदर हा ट्रेक केला होता तो एक गट, घुलेसरांचा एक गट व माझा एक गट. पहिला गट सर्वांच्या अगोदर किल्यावर पोहचला , आम्ही हळूहळू काळजी पूर्वक घसरड्या काटेरी पायवटेवरून चालत होतो, दुसरा गट रस्ता चुकला आम्ही आवाज देऊन, काही मुले दुसऱ्या गटाला बरोबर घेऊन आले व आम्ही पुन्हा दोन गट चढाई करू लागलो आता दरड कोसळलेल्या दगडावरून वर जायचे होते सर्व काळजी पूर्वक एकमेकांना हात देत चढत होते. चढताना पाऊस पडायला सुरवात झाली मुलांना खूपच आनंद झाला किल्यावरून खाली पाणी येताना छोटया धबधब्या सारखे वाटतं होते मुलांनी त्यात भिजण्याचा, फोटो selfie चा आनंद घेतला. आम्ही साधारण अडीच तासात किल्यावर पोहोचलो. किल्यावर पोहोचताच जोरदार पावसाने आमचे स्वागत केले. पाऊस थोडा कमी झाल्यावर आम्ही किल्ला पाहायला सुरवात केली.विसापूर किल्ला मोठा आहे आणि त्याच्या दुहेरी लोहगड किल्ल्यापेक्षा जास्त उंचीवर आहे. किल्ल्याच्या आत गुहा, पाण्याचे कुंड, आणि जुनी घरे आहेत, टेहळणी बुरुजा वरून संपूर्ण परिसर दिसतो. पडझड झालेले कडा दिसतात.एक मोठी तोफ व लहान तोफ ही पाहायला मिळते. सर्वांनी बुरुजावर एक ग्रुप फोटो काढला, घोषणा दिल्या. बुरुजवरून खाली आल्यावर सर्व भिजलेले कूडकुडनारे आम्ही गरम चहा चा आस्वाद घेतला, व किल्ला उतरायला सुरवात केली. चढाई पेक्षा उतरणे अवघड व धोकादायक होते . सर्व एकमेकांचे हात धरत,मदत करत उतरत होते. थोडं खाली आल्यावर काहींनी जेवण, काहींनी गरमागरम कांदा भाजींचा आस्वाद घेतला व पुन्हा उतरण्यास सुरवात केली. पाय घसरत होते, काहीजण घसरले ही पण लगेच बरोबरअसणाऱयांनी सावरले. काहींचे चप्पल तुटले,काहींना खर्चटले पण यामुळे कोणाचाही आंनद कमी नाही झाला. एक FY ची विद्यार्थीनी पहिल्यांदाच ट्रेक करत होती तिने उंच हिल्स घातले होते तिला पायाच्या बोटाला थोडं लागलं, लगेच एक मुलाने स्वतः ची चप्पल तिला घालायला दिली, ग्लुकोविटा घेऊन, instant pain relief spray मारून ती पुन्हा आनंदाने चालायला लागली. किल्ल्यावरुन उतरलो गावात आलो थोडं थांबत बोलत गंम्मत करत, काही मुले तर चक्क घसरगुंडी करत मज्जा घेत होती. दोन गट स्टेशनवर पोहचले तिसरा गटही साधारण 6 पर्यंत मळवली स्टेशन च्या बाहेर पोहचला . मुलांना भूक लागली होती काही मुलांनी चहा घेतला, काहींनी भेळ जिलेबी खाल्ली. यात उशीर झाला यामुळे 6.05 ची लोकल गेली. नंतरची ट्रेन 7.45 ला होती व अर्धा तास उशिरा होती त्या मिळालेल्या वेळात मुलांनी डान्स केला ,काहींनी पुशप्स कोण जास्त मारतो ही स्पर्धाच प्लॅटफॉर्म वर भरवली, काही थकले होते ते शांत बसले होते पण सर्व खुश होते. काही महत्वाच्या सूचना देऊन आम्ही परतीच्या दिशेने लोकल ट्रेन मध्ये चढलो. 9.20 ला खडकी स्टेशन ला उतरलो. अशा पद्धतीने TJ ट्रेकिंग क्लब चा किल्ले विसापूर ट्रेक यशस्वी पार पडला. या ट्रेक मध्ये एक गोष्टी प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे आपले विद्यार्थी समंजस, मदतीला धावणारे, काळजी घेणारे आणि परिस्थिती कशीही असो हसून निभाऊन नेणारे आहेत. सर्व गटनायक, व सर्व सहभागी विद्यार्थांमुळे हा ट्रेक यशस्वी झाला.