8/3/25 जिल्हास्तरीय एकदिवसीय “नेतृत्व विकास शिबिर”
“जगण्याची,यशाची धडपड ज्याला जमते त्याला यशस्वी नेतृत्व करता येते”-प्राचार्य डॉ. संजय चाकणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ आणि टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हास्तरीय एकदिवसीय नेतृत्व विकास शिबिर संपन्न झाले. विद्यापीठगीत आणि दीप प्रज्वलनाने शिबिराचे खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांच्या हस्ते पार पडले. नेतृत्वाला यश शिकवते. स्वप्न बघायला दाखवायला शिका म्हणजे स्वप्न साकार झाले की नेतृत्व आपोआप लाभते. जेवढा विरोध जास्त तेवढे यश आणि नेतृत्व अंगी बिंबते असे मत आपल्या सहज सुलभ मार्गदर्शनातून प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी यावेळी व्यक्त केले. उप प्राचार्य,प्रा. महादेव रोकडे, ज्येष्ठ प्रा.जुगल नाईक यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत महाविद्यालय विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक प्रा.भागवत शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत परिचय देताना विद्यार्थ्यांसाठी नेतृत्व विकास शिबिर घेण्यामागील प्रयोजनांचा आढावा घेतला.
उपप्राचार्य,प्रा.महादेव रोकडे यांनी’नेतृत्व म्हणजे केवळ पदावर बसणे नव्हे तर सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची क्षमतेचा विकास करणे होय. असे मत व्यक्त केले.प्रा.जुगल नाईक यांनी अनेक थोर व्यक्तींचा संदर्भ देत शिबिरार्थी विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक आणि सामाजिक नेतृत्वाची जडणघडण कशी करता येईल हे पटवून दिले. डॉ.नागेंद्र जंगम यांनी मानसशास्त्रातून आभासी जीवनशैली आणि व्यक्तिमत्व गुण क्षमतेतून नेतृत्व कसे विकसित होते याविषयी मार्गदर्शन केले. तर डॉ. कांचन पाटील यांनी स्व अनुभवातून नेतृत्वासाठी ग्रंथ वाचन किती महत्त्वाचे असते हे सांगितले.
डॉ. कांचन पाटील, डॉ.दीपालीऔसरमल, डॉ.सुजाता भालेराव,प्रा.कविता चव्हाण, डॉ. भाग्यश्री माताडे, डॉ. निलेश काळे, डॉ. पद्माकर घुले,डॉ. नागेंद्र जंगम, डॉ. स्नेहल उतेकर, ग्रंथपाल प्रा. आनंद नाईक, तंत्रसाह्य श्री. अमोल आमराव, श्री. बाबासाहेब गायकवाड, सेवक श्री.रमेश शेलार यांनी हे एक दिवसीय जिल्हास्तरीय शिबिर यशस्वी होण्यासाठी योगदान दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार डॉ. अविनाश कोल्हे यांनी मानले.

