कोहिनूर ग्रुप व टी. जे. महाविद्यालयाची राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा संपन्न

कोहिनूर ग्रुप आणि खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ (टी. जे.) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धेत कोल्हापूरच्या ‘सोहन प्रॉडक्शन’ने बाजी मारली. त्यांच्या ‘घरघर’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांकासह लेखन, दिग्दर्शन, उत्कृष्ट पुरुष व स्त्री कलाकार अशा विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली. ही स्पर्धा ११ ते १४ एप्रिल, २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडली.

​यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल म्हणाले की, “खडकी हे हॉकीसाठी प्रसिद्ध आहेच, परंतु आता या स्पर्धेच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. नाट्य कलावंतांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून आम्ही ही स्पर्धा सुरू केली असून, तिला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.”
​महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह स्वाती महाळंक यांनी कलाकारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “कलाकार घडण ही तपश्चर्या आहे. अनेक वर्षांची मेहनत अवघ्या एका तासात मांडणे सोपे नसते. महाराष्ट्राची नाट्य परंपरा जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या महाविद्यालयाने केले आहे.”
​यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “नाट्यकला ही समाजमनाचे प्रतिबिंब असते. आमच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून होत असलेल्या या प्रयत्नांमुळे राज्यभरातील उदयोन्मुख कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही यापुढेही अशा सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देत राहू.”
​स्पर्धेत मुंबई, ठाणे, बदलापूर, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर आणि पुणे या ठिकाणांहून एकूण २१ संघांनी सहभाग घेतला होता. द्वितीय क्रमांक बदलापूरच्या ‘अनुभूती’ संघाच्या ‘बिटवीन द डोअर’ आणि तृतीय क्रमांक अहिल्यानगरच्या ‘रसाअभिनय’ संघाच्या ‘काय प्रॉब्लेम ये का’ या एकांकिकेला मिळाला. तसेच, उत्तेजनार्थ पारितोषिके सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे यांच्या ‘हमको हिंदी नही आती’ आणि कलाकार मंडळी, पुणे यांच्या ‘नाटेक’ या एकांकिकांना प्रदान करण्यात आली.
​विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार व २१ हजार रुपये रोख आणि वैयक्तिक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संचालक रमेश अवस्थी, उपप्राचार्य राजेंद्र लेले, आयक्यूएसी समन्वयक गौरी माटेकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण अनिल कांबळे, नितीन धंदुके व किरण भुजबळ यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top