टि.जे.चं चांगभलं…”

“टि.जे.चं चांगभलं…”
“वार्षिक विविध गुणदर्शनात्मक सांस्कृतिक सोहळ्यास जल्लोषात प्रारंभ”..!
खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), खडकी, पुणे येथे “टि.जे.च्या नावाने चांगभलं…” या संकल्पनेखाली आयोजित वार्षिक विविध गुणदर्शनात्मक सांस्कृतिक सोहळ्यास मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषाने प्रारंभ झाला. दि. ३ ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चालणारा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या बहुविध कला-कौशल्यांचा उत्सव ठरणार आहे.
उद्घाटनप्रसंगी खडकी शिक्षण संस्थेचे सचिव मा. आनंद छाजेड, संस्था सदस्य मा. रमेश अवस्थी, नवनिर्वाचित नगरसेविका मा. सौ. सपनाजी छाजेड, सहसचिव तथा प्राचार्य डॉ. संजय चाकणे, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. सुचेता दळवी, तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. जुगल नाईक हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मा. आनंद छाजेड यांनी विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांना शुभेच्छा देत महाविद्यालयाच्या उज्ज्वल शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेविषयी अभिमान व्यक्त केला. सहसचिव तथा प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पार्श्वभूमी उलगडून सांगितली. राष्ट्रीय स्तरावरील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध कला व कौशल्याधिष्ठित गुणदर्शनाला शैक्षणिक मूल्यांकनात श्रेयांक देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असल्याचे नमूद करत, त्यांनी “विकसित भारत व्हिजन–२०२४”च्या पार्श्वभूमीवर पुस्तकज्ञानासोबत कौशल्याधारित शिक्षण आत्मसात करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
उद्घाटन सोहळ्यात विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर आपली कला-कौशल्ये सादर करत मनोरंजनात्मक व सर्जनशील उपक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी नगरसेविका मा. सौ. सपनाजी छाजेड यांनी खडकी शिक्षण संस्थेशी असलेल्या ऋणानुबंधांच्या आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त करत, पुढील काळात संस्थेच्या विविध शाखांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी खडकी परिसरात काढलेल्या “आनंद दिंडी”ने वाजत-गाजत करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे पार पाडले. सांस्कृतिक सोहळ्याचे स्वरूप सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. स्वामीराज भिसे यांनी विशद केले. तसेच सांस्कृतिक विभागसमन्वयक प्रा. अर्चना तारू यांनी त्या सोहळ्यात होणाऱ्या विविध कला मनोरंजन आणि उपक्रमांचा सविस्तर परिचय करून दिला उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे यांनी प्रास्ताविकातून सांस्कृतिक उपक्रमांचे शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. शितल रणधीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, सेवकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण वातावरण उत्साह, सर्जनशीलता व सांस्कृतिक चैतन्याने भारलेले होते.
अशा या ज्ञान, कला व संस्कारांच्या संगमातून घडणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत सुंदर शब्दांत अधोरेखित केले आहे;
“विद्या दान करी जो।तोचि जाणावा सज्जनो।तेणे उध्दरिला जगी जनो॥”
(ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी ३६)
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले हे सांस्कृतिक प्रयत्न खऱ्या अर्थाने ‘कृतिशील ज्ञानात्मकतेचा’ मार्ग दाखवणारे ठरतात, हेच या सोहळ्याचे मोलाचे फलित होय.

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top